Nanded Lok Sabha Bypoll: काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक अखेर काँग्रेसनं जिंकली आहे. मतमोजणीच्या अखेरच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी जोरदार कमबॅक केलं.
संध्याकाळी ४ वाजता भाजप उमेदवार संतुकराव हंबर्डे यांनी ३५ हजार मतांची आघाडी घेतली होती. पण मतमोजणीच्या शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये बाजी उलटली. अतिशय अटीतटीच्या सामन्यात रविंद्र चव्हाण यांनी नांदेडची जागा काँग्रेससाठी राखली. त्यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मतं मिळाली. तर हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मतं मिळाली.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी विजय मिळवला. पण ऑगस्टमध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळे नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली. ती विधानसभा निवडणुकीसोबतच घेण्यात आली. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला. आज आपली लोकसभेची आणखी एक जागा वाढली आहे, असं मोदी म्हणाले होते.
नांदेडमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या लोकसभा खासदारांची संख्या ९ वरुन १० वर पोहोचली आहे, असं मोदी म्हणाले होते. पण मोदींचं विधान, त्यांचा दावा काही वेळातच चुकीचा ठरला. मोदींच्या भाषणानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नांदेड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल दिसू लागला. त्यात काँग्रेसनं १ हजार ४५७ मतांनी विजय मिळवला.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात प्रचंड मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीनं ४८ पैकी ३० जागांवर विजय साकारला. काँग्रेसनं १३, शिवसेना उबाठानं ९, तर राष्ट्रवादी काँग्रेस शपनं ८ जागा जिंकल्या. महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं. भाजपला ९, शिवसेनेला ७, तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली होती.