Devendra Fadnavis Will Be Maharashtra CM : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. भाजपच्या बैठकीत आज एकमताने फडणवीसांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आज दुपाती साडे तीन वाजेदरम्यान महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी महायुतीतील तिनही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते अजित पवार हे राज्यपालांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठीचं पत्र सादर केलं जाईल.
फडणवीसांच्या फेट्याने दिलेले मुख्यमंत्रिपदाचे संकेत
भाजपचे संपूर्ण १३२ आमदार आज विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. तिथेच ही बैठक पार पडली, जिथे आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. याला सर्व आमदारांनी अनुमोदन दिलं आणि फडणवीसांची एकमुखाने गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र, फडणवीस यांचीच निवड होणार याचे संकेत या बैठकीपूर्वीच मिळाले होते.
विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी सर्व १३२ आमदारांना भगवे फेटे बांधण्यात आले. सर्व आमदारांना एकसारखे फेटे बांधण्यात आले होते. भगव्या रंगाचा हा फेटा होता ज्याला सोनेरी रंगाची बारीक काठ होती. तर, तुऱ्यालाही सोनेरी रंगाची बारीक काठ होती. हे सर्व आमदार सेंट्रल हॉलमध्ये बसून वरिष्ठ नेत्यांच्या येण्याची प्रतिक्षा करत होते. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यावर जेव्हा इतर नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलकडे निघाले तेव्हा त्यांच्याही डोक्यावर फेटा बांधलेला होता. पण, हा फेटा इतर आमदारांच्या फेट्यापेक्षा खूप वेगळा होता.
फडणवीसांना जो फेटा बांधण्यात आला होता, तो अत्यंत आकर्षक होता. रंग जरी सारखा असला तरी तो फेटा इतरांपेक्षा वेगळा होता. जिथे इतर आमदारांचे फेटे हे भगव्या रंगाचे आणि बारीक सोनेरी काठाचे होते. तिथे फडणवीसांच्या फेट्याला मात्र मोठी सुवर्ण काठ होती. त्यांचा तुराही अत्यंत आकर्षक दिसत होता. फडणवीसांच्या फेट्याला मोठी सुवर्ण काठ होती आणि त्याला हिरव्या रंगाची बारीक काठ होती. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप वेगळे दिसत होते. फडणवीसांनी प्रवेश घेताच तेच मुख्यमंत्री होणार याचे संकेत त्यांच्या या शानदार फेट्याने दिले होते.