हायलाइट्स:
- संभाजी ब्रिगेडवर राज ठाकरे यांचा निशाणा
- इतिहासाचं आकलन नसल्याच्या टीकेला दिलं उत्तर
- जातीयवादाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीवर पुन्हा घणाघात
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी जातीयवादाच्या मुद्द्यावर भाष्य केल्याने सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी एक पोस्ट लिहित राज ठाकरेंना इतिहासाचं आकलन नसल्याची टीका केली होती. या टीकेला आता राज यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘मुळात ज्याचं काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय हे मला माहीत आहे, माझ्या पक्षाला आणि सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे मला मोजण्याचा प्रयत्न करू नये,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडवर निशाणा साधला आहे.
जेम्स लेन प्रकरणावर पुन्हा काय म्हणाले राज ठाकरे?
‘राजकीय फायद्यासाठी ठरवून जाती-जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. मी त्यादिवशी म्हणालो की आता कुठे आहे जेम्स लेन? नेमका तेव्हाच कसा तो आला आणि आग लावून निघून गेला? यामागे मोठं षडयंत्र आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच राज यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचायला हवं, असा सल्ला देणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘प्रबोधनकार तुम्हाला पण परवडणारे नाहीत, आणायचे असतील तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा, मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आहात.’
संभाजी ब्रिगेडने राज ठाकरेंवर काय टीका केली होती?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज यांच्या या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला होता. ‘राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. राजकारणात कुठलंही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे,’ असा घणाघाती आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला होता.