Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lakshmi Puja 2024: दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते? ही संकल्पना कधीपासून सुरु झाली? जाणून घ्या महत्त्व
Laxmi Puja Importance: लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. दरम्यान ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस सर्वात महत्वाचा मानला गेला आहे. प्रत्येक घरात यादिवशी लक्ष्मी-कुबेराची पूजा केली जाते. पारंपरिक पद्धतीने घराघरात लक्ष्मी पूजन केले जाते. या पूजनामागे एक गहन अर्थ दडलेला आहे. ती संकल्पना समजून घेवूया या लेखात.
लक्ष्मीपूजन कथा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्या प्रित्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वत:च्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते. याच दिवशी प्रभू रामचंद सीतामाईला घेऊन आयोध्येत आले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली. याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले.
स्थिर लग्न मुहूर्तावर लक्ष्मीपूजन
अश्विन वद्य अमावस्या म्हणजे ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते हे विशेष आहे. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, ज्योतिषशास्त्रानुसार स्थिर लग्न मुहूर्तावर करतात.
लक्ष्मीपूजन मांडणी
दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वस्तिक काढावे. त्यावरच श्री लक्ष्मी आणि श्री कुबेराची मूर्ती याची मनोभावे पूजा करावी. लाह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवावा, श्री सूक्ताचे पाठ करावे. योग्य मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्यास ते लाभदायक ठरते असं म्हटलं जातं.
अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्याची प्रथा आहे.
रात्री बारा वाजता केर का काढतात?
असेही म्हणतात की, अश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि सर्व वायूमंडला जावून बसतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी घरात केर, कचरा काढला जातो, की जेणी करून वायू मंडळात गतिमान असणारे त्रासदायक घटक बाहेर फेकली जातील. घराचे पावित्र्य टिकून रहावे म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच रात्री बारा वाजता घरात केर काढतात. अजून एक महत्वाची गोष्ट लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते, ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिची हळद-कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात होते.
स्वच्छता आणि सकारात्मकता तिथे लक्ष्मीचे वास्तव्य
प्रत्येक राज्यात लक्ष्मीपूजनाची एक वेगळी पद्धत असते त्यापैकी आंध्रप्रदेशातील लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात. महिला रात्रभर मचाणात बसून पणतीच्या प्रकाशात लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. त्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावल्या जातात. आश्विन अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानले जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते. असे सांगतात की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं.