Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नंदुरबार, दि. २८ (जिमाका) : सिकलसेल आजार निर्मूलनासाठी महत्त्वाकांक्षी तपासणी मोहीम नंदुरबार जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव काकाटे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. सिकलसेल आजाराचे निर्मूलन आपले उद्दीष्ट असल्याचे पालकमंत्री श्री. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. पुढील दोन वर्षांत 0 ते 40 वयोगटातील 8 लाखांहून अधिक नागरिकांची याअंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः सिकलसेल आजाराची तपासणी करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार अमशा पाडवी, आमदार शिरीष नाईक, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे तसेच विशेष निमंत्रित सदस्य डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखिलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके आणि ॲड. राम रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. माणिकराव काकाटे म्हणाले की, या तपासणी मोहीमेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे. “सिकलसेल आजाराचे निर्मूलन हे आपले उद्दिष्ट आहे. नागरिकांनी तपासणी करून सहकार्य करावे आणि जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे निर्मूलन करण्यास हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या संधीचा लाभ घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करावे, हीच या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै 2023 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशनच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल तपासणी मोहीमेची अंमलबजावणी होत आहे. सिकलसेल आजार हा जिल्ह्यातील गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक असल्याने यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 90 हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित नागरिकांची तपासणी करून या आजाराचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
तपासणीत आढळलेल्या सिकलसेल रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचार केले जातील. रुग्णांसाठी समुपदेशन व आवश्यक ते उपचार दिले जातील. तसेच सिकलसेल वाहकांमध्ये जनजागृती अभियान राबवून पुढील पिढ्यांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. आजपर्यंत जिल्ह्यात 100 रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लवकरच सर्व सिकलसेल रुग्णांना प्रमाणपत्र मिळणार असून, मोफत रक्तपुरवठा कार्ड देण्याचीही योजना आहे.
०००