Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अक्षयसाठी हा सिनेमा हिट होणे अत्यंत आवश्यक होते. कारण याआधी त्याचे सलग चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. त्यामुळे ‘सेल्फी’ हा त्याच्यासाठी वेक-अप कॉल आहे. आता सेल्फीसोबत घडलेल्या प्रकाराकडे अक्षयला अलार्म म्हणून बघणे आवश्यक आहे आणि करिअरच्या दृष्टीने योग्य पावलं उचलण्यासाठी खडबडून जाहे होणेही आवश्यक आहे. यापुढे चित्रपट निवडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
राज मेहता दिग्दर्शित ‘सेल्फी’ला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात एका सुपरस्टारची त्याच्या सुपरफॅनशी लढाई दाखवली आहे. मात्र हे कथानक पहिल्या दिवशी प्रेक्षकांना भुरळ घालू शकले नाही. आता पुढील आठवड्यात काही चमत्कार घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पण तसे घडण्याची शक्यता धुसर आहे. जे काही मोजके प्रेक्षक सिनेमागृहात पोहोचले, ते केवळ अक्षयचे चाहते असल्याने पोहोचले होते. मात्र सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनुसार त्यांचीही निराशाच झाल्याचे चित्र आहे.
अक्षयचा पाचवा फ्लॉप सिनेमा
२०२१ मध्ये ‘सूर्यवंशी’ रिलीज झाल्यापासून अक्षय एका जबरदस्त हिट सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षा बंधन’ आणि ‘राम सेतू’ हे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. प्रेक्षकांनीही या सिनेमांना चांगला प्रतिसाद दिलेला नाही. आता या यादीत ‘सेल्फी’चेही नाव जोडले गेले आहे.
सर्वात अयशस्वी ओपनिंग
अक्षय आणि इम्रान व्यतिरिक्त, चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी आहेत. सुमारे १५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशातील २००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. दरम्यान अक्षयच्या ‘राम सेतू’ने पहिल्या दिवशी १४.८१ कोटींचा गल्ला जमवलेला, तर ‘रक्षा बंधन’चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन ०८.०२ कोटी होते. सेल्फीची अवस्था त्याहून बिकट आहे. सेल्फीचे पहिल्या दिवशीचे बहुतांश शो रिकामे होते. मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी सेल्फीने ४ ते ५ कोटींची कमाई केली. वाईट बाब म्हणजे १९९४ साली स्टार बनल्यापासून आजपर्यंत अक्षयच्या एकाही चित्रपटाला पहिल्याच दिवशी असे अपयश मिळाले नव्हते. पहिल्या दिवशी नेहमीच अक्षयचे सिनेमे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहत होते. पण ‘सेल्फी’च्या बाबतीत भलताच प्रकार पाहायला मिळाला.