Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्रीक्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे महात्म्य !

9
दत्तगुरुंना भेटण्यासाठी लाखो लोक श्री क्षेत्र गाणगापूरला येतात.कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील गाव असून दत्तगुरुंचे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम ज्याठिकाणी होतो तिथे वसलेले आहे. दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी २२ ते २३ वर्षे येथे वास्तव्य केले. निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका यांचे महात्म्य येथे आहे.

“प्रसिद्ध आमुचा गुरु जगी । नृसिंह सरस्वती विख्यात ॥
ज्याचे स्थान गाणगापूर । अमरजा संगम भीमातीर ॥”

दत्त भक्तांची पंढरी अर्थात श्री क्षेत्र गाणगापूर, दरवर्षी भक्तगण आपल्या दत्तगुरुंना भेटण्यासाठी येथे येतात. जेव्हा गाणगापूर असे म्हटले जाते, त्यावेळी डोळ्यासमोर उभ्या राहतात “निर्गुण पादुका” ! या दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ असे म्हणतात. गाणगापूरचे मुख्य पुजारी श्री.विजय भीम भट्ट निगुर्ण पादुकांची महती सांगताना म्हणाले, “गाणगापुरमधील निगुर्ण पादुकांना खूप महत्त्व आहे. निर्गुण म्हणजे आकार नसलेल्या तर सगुण म्हणजे बोटं, नख वगैरे आहेत. निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार !” श्री नृसिंह सरस्वती महाराज भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहले. त्यानंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी “श्री नृसिंहसरस्वती” महाराजांनी दर्शन दिले आणि सांगितले, “मी निर्गुण पादूका सोडून कुठे जात नाही आणि गाणगापूर सोडून कुठे जात नाही, तुम्ही या निर्गुण पादुकांची पुजा करत राहा. त्याला पाणी, दही, दुध कशाचाही स्पर्श करायचा नाही. अत्तर आणि केशरचा वापर करायचा. तेव्हापासून आत्तापर्यंत पद्धतीने निर्गुण पादुकांची पूजा केली जाते आहे. या पादुका चल असून त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत अशी माहिती मुख्य पुजारी यांनी दिली.

औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत ही श्री दत्तगुरुंची प्रसिद्ध ठिकाणं म्हणून ओळखली जातात पण सर्वात जास्त गर्दी असते ती श्री क्षेत्र गाणगापूर येथे, याबद्दल माहिती देताना मुख्य पुजारी श्री. विजय भीम भट्ट म्हणाले, “गाणगापुरला लोकं जास्त येण्याचे कारण म्हणजे, मध्यमवर्ग दत्तमहाराजांना खूप मानतो. आज भक्तांची अपार श्रद्धा दत्तगुरुंवर आहे. श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत तसेच भाविकांना आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुम्ही मंदिरात येवून दर्शन घेवू शकता.गाणगापूरमध्ये पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. पहाटे होणाऱ्या काकड आरतीला भाविकांची अलोट गर्दी असते. आधी या स्थानाची महती लोकांना माहित नव्हती पण नंतर लोकांना ते समजलं, एकमेकांकडून याचा प्रसार झाला. गाणगापूरला अष्टतीर्थांचा नित्य वास असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा त्यामुळे दिवाळीत लाखो भक्तांची गर्दी गाणगापुरात पहायला मिळते अशी माहिती सुद्धा पुजारी भट्ट यांनी दिली.

श्री. विजय भीम भट्ट सांगतात, “श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी कुठे ही मठ केला नाही. दत्त निवास म्हटले की औदुंबर,नरसोबाची वाडी आपल्या डोळ्यासमोर येते पण गाणगापूर येथेच त्यांनी मठ केलेला आहे.त्यामुळे गाणगापूरला गर्दी जास्त असते. औदुंबर,नरसोबाची वाडी सगळीकडे श्री दत्त गुरुंचा निवास आहे पण श्री क्षेत्र गाणगापूर जास्त प्रसिद्ध आहे. भाविकांमध्ये त्याबद्दल खूपच आदर आहे.पिशाच्च विमोचनासाठी हे एक महातीर्थच आहे. करणी बाधा सगळं काही निघून जातं पण त्यासाठी कठोर सेवा करावी लागते” असे ही मुख्य पुजारी विजय भीम भट्ट यांनी स्पष्ट केले. “जेव्हा भाविक सेवा देण्यासाठी येथे येतात तेव्हा पहाटे २ वाजता उठून नदीत आंघोळ करून आरती आणि दर्शन घेवून प्रदशिणा घालतात. कमीत कमी १०८ प्रदक्षिणा घालाव्याच लागतात. तुम्ही जास्त प्रदक्षिणा घातल्या जर चांगलेच आहे. सकाळी साडे सहाला आरती झाली की भाविक अष्टतीर्थला जातात. निर्गुण मठापासून ते २ ते ३ किलोमीटर आहे. पाऊस असो किंवा ऊन वारा भक्त तिथे जातात” असे ही पुजारी भट्ट म्हणाले. येथे आलेले भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वत: श्रीनृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत.

‘वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ॥
तया गाणगापुरासी । माध्यान्हकाळी परियेसा ॥’

असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. भक्तगण येथे यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. नेहमी येथे गुरुचरित्राचे पठण केले जाते ते शांत चित्ताने ऐकणे हा देखील सेवेचा एक भाग असतो. श्रीक्षेत्र गाणागापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची पावनभूमी, येथे त्यांनी अनेक भक्तांची दु:खे, संकटे कमी केली. निर्गुण पादुकांच्या रुपात साक्षात त्यांचे सगुण रुप पाहता येते त्यामुळे श्रीक्षेत्र गाणागापूरला एकदा तरी जायला हवे.

मठी ठेवीतो निर्गुण पादुका । पुरवीतील कामना ऐका
संदेह न धरावा मनात । ही मात आमची सत्य जाणा ॥

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.