Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण करणाऱ्यांवर,होणार धडक कारवाई

7

पुणे,दि.३१:-पुणे शहरातील अतिक्रमण, व अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाकडून आता पोलिसांसमवेत संयुक्त कारवाई केली जाणार आहे. पुणे महापालिका व पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या बैठकीनंतर संयुक्त कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

त्याचबरोबर पुणे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशा तिघांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत आता गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार असून अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठीही ठोस उपाय केले जाणार आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम विभागांसह विविध विभागांकडून कारवाई करत असताना अनेकदा पोलिस प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नव्हती. अनेक गंभीर प्रकरणातही पोलिसांकडून गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते.

त्यामुळे महापालिका प्रशासनाला कारवाई करताना अडथळे येत होते. या पार्श्‍वभूमीवर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मंगळवारी पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यामध्ये महापालिकेने शहरातील बेघर नागरिकांसाठी “नाईट शेल्टर’ सुरू केले आहेत, तरीही अनेक नागरिक शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, रेल्वे, बसस्थानकांच्या परिसरात तळ ठोकतात.

त्यांच्यावर कारवाई करणे, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरुद्धच्या कारवाईवेळी अनेकदा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात, त्याची पोलिसांकडून दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, पाठपुरावा करूनही गांभीर्याने घेतले जात नसल्याचे यावेळी महापालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

या पार्श्‍वभूमीवर, महापालिकेच्या कारवाईमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील.

कारवाईच्यावेळी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच तातडीने गुन्हे दाखल करण्यासाठी हे अधिकारी समन्वय साधतील. तसेच अनधिकृत बांधकाम कारवाईवेळी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणाऱ्या शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकारांबाबत तातडीने गुन्हे दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, असे या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. तसेच प्रत्येक १५ दिवसांनी बैठक घेऊन, त्यामध्ये कारवाईचा आढावा घेण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.