Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवनिर्वाचित २५१ खासदारांवर क्रिमिनल केस; ADRचा धक्कादायक अहवाल, सर्वाधिक महिला खासदार भाजपच्याच

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात निवडून येणाऱ्या कलंकित खासदारांची संख्या वाढत चालली आहे. अठराव्या लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी तब्बल २५१ (४५ टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात गुन्हेगारी आरोप असलेल्या वा सिद्ध झालेल्या सदस्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्याच वेळी महिला खासदारांची संख्या मात्र ७७वरून कमी होऊन ७४वर (१४ टक्के) आली आहे.‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रीफॉर्म्स’ (एडीआर) या निवडणूक विश्लेषण संस्थेने ही माहिती दिली आहे. नवनिर्वाचित १४ टक्के महिला खासदारांमध्ये भाजपच्या सर्वाधिक ३१, काँग्रेस १३, तृणमूल काँग्रेस ११, समाजवादी पक्ष ५, लोकजनशक्ती (रामविलास) २ आणि इतर पक्षांच्या खासदार आहेत. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ५३९पैकी ७७ खासदार महिला होत्या. सन २०१९मध्ये निवडून आलेल्या २३३ खासदारांवर (४३ टक्के) गुन्हे दाखल होते. त्या आधीच्या लोकसभेत ही संख्या १८५ (३४ टक्के), सन २००९मध्ये १६२ (३० टक्के) होती. सन २००४मध्ये १२५ (२३ टक्के) खासदारांवर गुन्हे दाखल होते. या विश्लेषणानुसार, सन २००९पासून गुन्हेगारी खटले असलेल्या खासदारांच्या संख्येत तब्बल ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा २५१ कलंकितांपैकी १७१ (३१ टक्के) खासदारांवर बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सन २००९पासून गंभीर गुन्ह्यांची शिक्षा असलेल्या संसद सदस्यांची संख्या १२४ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा चार उमेदवारांवर भारतीय दंड संहितेचे (आयपीसी) कलम ३०२ म्हणजे थेट हत्येचा गुन्हा असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. १५ नवनिर्वाचित खासदारांवर बलात्कार व महिलांवरील गुन्ह्यांचे खटले (कलम ३७६) दाखल आहेत.
नव्या संसदेत बसणार साक्षात धनकुबेर; ९३ टक्के खासदार कोट्यधीश, जाणून घ्या टॉप-३मध्ये कोण?
या १८व्या लोकसभेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम ठेवणाऱ्या भाजपच्या २४० विजयवीरांपैकी सर्वाधिक ९४ (३९ टक्के) उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या ९९ विजयी उमेदवारांपैकी ४९, सपच्या ३७पैकी २१, तृणमूल काँग्रेसच्या २९पैकी १३, द्रमुक २२पैकी १३ (५९ टक्के) तेलुगू देसम १६पैकी आठ आणि शिवसेनेच्या सातपैकी पाच (७१ टक्के) विजयी उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

श्रीमतांमध्ये तेलुगू देसमचा खासदार अव्वल स्थानी

पहिल्या तीन श्रीमंत उमेदवारांमध्ये तेलुगू देसमचे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी ५,७०५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह अव्वल स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर तेलंगणचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी (भाजप) आहेत. त्यांच्याकडे ४,५६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि तिसऱ्या स्थानावरील भाजपचे नवीन जिंदाल (हरयाणा) यांच्याकडे १,२४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त माया आहे. पहिल्या १० श्रीमंत खासदारांत भाजपचे पाच, टीडीपीचे तीन आणि काँग्रेसचे दोन आहेत. ही माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील असून इतर संपत्तीचा समावेश अहवालात करण्यात आलेला नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.