Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ashok Pawar Allegation on Ajit Pawar: उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीच अशोक बाप्पू पवार यांनी गुरुवारी शिरूर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा जनसमुदाय अशोक बाप्पू पवार यांच्यासमवेत उपस्थित होता. अर्ज भरल्यानंतर अशोक पवार यांनी सभेदरम्यान राष्ट्रवादी पक्षफुटीचा अंतर्गत किस्सा सांगितला आहे.
अशोक पवार भाषणात म्हणाले, ‘तुम्ही आम्हाला मुंबईला बोलावलं आणि फसवून सही घेतली. पेपरवर सगळं झाकून ठेवलेलं होतं, फक्त वरचा स्टॅम्प दिसत होता. आम्ही उभ्या उभ्या सही केली. त्यानंतर बाहेर आल्यावर दिलीप मोहिते भेटले आणि म्हणाले, ‘सही केली का?’ मी हो म्हटलं. त्यांनी विचारलं, ‘वाचलं का?’ मी म्हटलं, ‘आमच्या नेत्यावर विश्वास आहे, कशाला बाकी चौकशी करायची?’ मोहिते हसले, पण नंतर कळलं की सही कशावर होती. तरीही आज आम्ही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला’
यासोबतच पवारांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आम्हाला धमकीचे फोन येत होते. ‘तुझी आमदारकी घालवतो. तुला परत आमदारकीला उभं राहता येणार नाही कारण तू माझ्या पेपरवर सही केली.’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. पण मी उत्तर दिलं, ‘दादा, तुम्ही माझी सही फसवून घेतली. फसवून घेतली तरी चालेल, पण जीव गेला तरी शरद पवारांना सोडणार नाही.’ असा खुलासा देखील अशोक पवारांनी केला आहे.
शरद पवारांच्या पहिल्या यादीत अशोक पवारांना स्थान
गुरुवारी सायंकाळी जाहीर झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रावादीच्या पहिल्या यादीत अशोक पवारांना स्थान मिळाले आहे. पक्षफुटीच्या वेळी बंडखोर आमदारांमध्ये सामील होते. पण नंतर पुन्हा ते शरद पवारांसोबत आले. आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचे ठाणले होते. त्यांच्यासोबत खासदार अमोल कोल्हेंनी देखील त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावलेला पाहायला मिळाला. त्यांना अखेर उमेदवारी मिळाली असून ते आपला गड राखण्यात यशस्वी होतात का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.