Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुण्यात महायुतीचे बंडोबा थंड, पण मविआच्या डोक्यावर टांगती तलवार; चार विधानसभेतील नेत्यांचा लागणार कस
Pune Vidhan Sabha Rebels: २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. येत्या ५ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. यातच पुणे विधानसभेच्या रिंगणात काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, कारण तिन्ही जागांवर काँग्रेसचे बंडखोर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यासोबतच पर्वती विधानसभेत देखील राष्ट्रवादीतील निष्ठांवत नाराज झाले आहेत.
महायुतीतदेखील प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत होते. कोथरूड मतदारसंघात अमोल बालवडकर यांनी भाजपतून बंडखोरी करत शिवसेनेतून उमेदवारी मिळवण्यासाठी मातोश्रीवर दोन दिवस मुक्काम केला. तर कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्याने शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपली नाराजी थेट सोशल मीडियावर व्यक्त केली होती. माजी आमदारपुत्र कुणाल टिळक यांनीही माध्यमांतून नाराजी व्यक्त केली. पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भिमाले यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला होता, मात्र चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळाल्याने श्रीनाथ भिमालेही नाराज झाले होते. भाजपने या सगळ्या बंडखोरांची नाराजी दूर करत विधानसभा निवडणुकीतील अडसर दूर केले. पण महाविकास आघाडीत अद्यापही बंड शमले नाही.
Mumbai News: मुंबादेवी विधानसभेचे माजी आमदार म्हणतात ‘मै जिंदा हुं ये पार्टी को बताना था’
भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसबा मतदारसंघात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ते पराभवानंतर कामाला लागले आहेत. मात्र त्यांच्यापुढे पक्षांतर्गत बंडखोरांचे आव्हान आहे. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंड केल्यामुळे धंगेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजी दूर होते की त्या निवडणुकीला सामोरे जातात, हे पाहावे लागणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते आबा बागुल नाराज झाले आहेत. पर्वतीसाठी त्यांनी शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा भेटी दिल्या. मात्र ती जागा राष्ट्रवादीकडे ठेवत पुन्हा एकदा शरद पवार यांनी अश्विनी कदम यांना संधी दिली. त्यामुळे आबा बागुल यांनी अपक्ष फॉर्म भरत निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी केंद्रातून फिल्डिंग लावली गेली. भाजपचे सनी निम्हण काँग्रेसमधून उमेदवारीसाठी चर्चेत असताना, पक्षाशी निष्ठा राखलेल्या कार्यकर्त्यांचा विचार करावा, असा आग्रह धरत दत्ता भैरट यांनी एबी फॉर्म आणला. मात्र, पक्षासोबत अनेक वर्ष काम करूनही त्यांचा विचार झाला नाही, असे म्हणत मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
तिन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेते कसा कस लावणार हे पाहावे लागणार आहे.