Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Election 2024 Exit Poll: भाजपला ‘या’ तीन राज्यांतून एकतर्फी आघाडी? जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यूनुसार, एनडीए ३५९ व इंडिया १५४ आणि इतर ३० जागा जिंकू शकतात. भास्करच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३५३ ते ३६८ जागा, ‘इंडिया’ला १४५ ते २०१ जागा आणि इतरांना ३३ ते ४९ जागा मिळू शकतात. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलने भाकीत केले आहे की, एनडीए ३४२ ते ३७८ जागा जिंकू शकते. ‘इंडिया’ १५३ ते १६९ जागा जिंकू शकते आणि इतर २१ ते २३ जागा जिंकू शकतात. इंडिया न्यूज-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३७१, ‘इंडिया’ १२५ आणि इतरांना ४७ जागा मिळतील, असा अंदाज आहे. रिपब्लिक भारत मॅट्रिजने एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केला आहे की एनडीए लोकसभेच्या ३५३ ते ३६८ जागा जिंकू शकेल. ‘इंडिया’ला ११८ ते १३३ जागा आणि इतरांना ४३ ते ४७ जागा मिळू शकतात.
राजधानी दिल्लीत भाजप सातपैकी किमान सहा जागा जिंकण्याचा अंदाज आहे. हरयाणातही १० पैकी ७ जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. पश्चिम बंगालमध्ये भाजप ४३पैकी २१-२२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरेल. तृणमूल कांग्रेस २१ व कांग्रेस व इतर पक्षांना एक जागा मिळेल. ओडिशातही भाजपला २१पैकी सर्वाधिक १२-१३ जागा मिळतील असे दिसते.
महाराष्ट्रातही एनडीए
बिहार, महाराष्ट्र व पंजाबातील एक्झिट पोलचे अंदाज चक्रावणारे आहेत. विशेषतः महाराष्ट्रात एनडीएला बारामतीसह २९-३० व महाविकास आघाडीला १७ ते १८ जागा मिळू शकतात. राज्यात स्वतः भाजपच्या कामगिरीत (२३ जागा) फारसे नुकसान होताना दिसत नाही. शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे मात्र मोठे नुकसान होणार असल्याचे दिसते. टाइम्स नाऊ-नवभारत, एनडीटीव्ही ‘पोल ऑफ एक्झिट पोल’, रिपब्लिक मॅट्रिक्स आदींनुसार एक्झिट पोलनुसार शिंदे गटाला केवळ चार व अजित पवार गटाला एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ही एकमेव जागा साऱ्या देशातील लक्षवेधी जागांपैकी एक असलेली बारामती असू शकते असाही काहींचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातून भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याला बळ मिळेल, असा दावा पक्षाकडून करण्यात येत होता. मात्र, ४५हून अधिक जागांचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘सी वोटर’च्या अंदाजानुसार महायुतीला २२ ते २६ व महाविकास आघाडीला २३ ते २४ जागा मिळू शकतात. ‘न्यूज २४-चाणक्य’च्या सर्वेक्षणानुसार एनडीएला ३३ जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर, महाविकास आघाडीला १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टीव्ही ९-पोलस्ट्राटच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महायुतीला २२ जागा व महाविकास आघाडीला २५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.