Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधी उमेदवार, मग माघार; शिंदेंची चाल, अमित ठाकरेंचं निमित्त, उद्धव ‘काकां’ना खलनायक करणार?

8

Mahim Vidhan Sabha : उद्धव ठाकरे यांना ‘खलनायक’ करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर, मनसेकडून अमित ठाकरे, तर ठाकरे गटाकडून महेश सावंत अशी तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. मात्र अमित ठाकरे यांचा विजय सुकर व्हावा, यासाठी सदा सरवणकर यांना माघार घ्यायला सांगण्याबाबत महायुतीत चाचपणी सुरु आहे. या प्रयत्नात उद्धव ठाकरे यांना ‘खलनायक’ करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

तिरंगी लढतीचं चित्र

विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगणार असल्याचे चित्र असताना या निवडणुकीत मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या नावाचा समावेश होता. याच मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उतरवलं. त्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून महेश सावंत यांनाही उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात अटीतटीची लढत होईल, असे चित्र असताना आता यात बदल होण्यासारखी परिस्थिती आहे.

पुतण्याविरुद्ध उमेदवार दिलाच

वरळीत २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता. त्यानंतर २०२४ मध्ये जेव्हा अमित ठाकरेंच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चा सुरु झाल्या, त्यावेळी उद्धव ठाकरेही विरोधात उमेदवार न देता परतफेड करतील, अशा चर्चा सुरु झाल्या. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात उमेदवार देताना ठाकरे पहिल्या यादीवेळी थांबलेही होते. मात्र शिंदेंनी सरवणकरांना तिकीट देताच ठाकरेंनीही आपला मोहरा मैदानात उतरवला.

राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची दोस्ती

आता मात्र सदा सरवणकर यांना अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेण्यास शिवसेना भाग पाडणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरू असल्याचे समजते. नारायण राणे, आशिष शेलार या राज ठाकरेंच्या मित्रांनी उघडपणे तसं बोलूनही दाखवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेला नाही. त्यातच राज आणि एकनाथ शिंदे यांचे मैत्र पाहता, किंवा लोकसभेला मनसेने पुरवलेली रसद लक्षात घेता, शिंदेंनी अमित ठाकरेंचा रस्ता सुकर करणं साहजिक आहे.

Uddhav Thackeray : आधी उमेदवार, मग माघार; एकनाथ शिंदेंची चाल, अमित ठाकरेंचं निमित्त, उद्धव ‘काका’ खलनायक ठरणार?

सदा सरवणकर गेली अनेक वर्षे माहीम विधानसभेचे आमदार आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर खरेच त्यांच्या जागेचा त्याग करणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र दबाव वाढल्यास सरवणकर आपली उमेदवारी मागे घेतील आणि महायुती-मनसे यांच्या महामैत्रीचे गोडवे गायले जातील.

ऐनवेळी माघारीचं शिवसेनेचं तंत्र?

विशेष म्हणजे, सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज तर दाखल करतील. मात्र चार नोव्हेंबरला उमेदवारी मागे घेण्यास काहीसा अवधी शिल्लक असतानाच ते माघार घेऊ शकतात. यामुळे ठाकरे गटाला विचार करण्यास आणि उमेदवारी मागे घेण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे मनसेने २०१९ मध्ये दाखवलेला दिलदारपणा विरुद्ध यंदाचं ठाकरे गटाचं राजकारण असं ‘नरेटिव्ह’ सेट केलं जाऊ शकतं.
Shrinivas Vanga : बंडात साथ, तरी फिरवली पाठ; ज्या आमदाराच्या मुलाच्या बर्थडेचं कारण सांगून सुरत गाठली, त्याचंच तिकीट कापलं

भाजपचे ठाकरेंना टोले

याआधी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही सरवणकर यांची उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्त त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. ‘उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्याशी नाते असल्याचे वाटत नसेल; पण महायुतीला अशा नात्यागोत्याविषयी फार काही वाटते. आमच्या घरातील अमित ठाकरे पहिलीच निवडणूक लढवत असतील, तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे’ असेही शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते.
Amit Thackeray : सदा सरवणकरांना कशाला भेटू? ते महापुरुष आहेत का? अमित ठाकरेंनी हसत विषय उडवला

अमित ठाकरेंना काकाबद्दल काय वाटतं?

अमित ठाकरे यांनीही बोलताना उद्धव ठाकरेंना काय वाटतं, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी आजारी असताना त्यांनी मनसेचे नगरसेवक फोडले, हा दाखला देत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दोघं भाऊ एकत्र यावेत, असं पूर्वी वाटायचं मात्र आता वाटत नाही, असंही अमित म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ‘व्हिलन’ म्हणून प्रोजेक्ट करण्यास मनसेला यश मिळू शकतं.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.