Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
त्या पराभवानंतर खचला होता अवघा देश
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जाणून घ्या या गाण्याच्या मेकिंगची कहाणी, स्वत: राष्ट्रकवी प्रदीप यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी सांगितले होते. कवी प्रदीप यांनी १९९० साली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे गाणे कसे तयार झाले याविषयी भाष्य केले होते. या गाण्याची संकल्पना कशी सुचली याविषयी बोलताना ते म्हणाले की, १९६२ साली चीनसोबत झालेल्या युद्धात भारताचा पराभव झालेला. यानंतर संपूर्ण देशाचे मानसिक खच्चीकरण झालेले. सर्वांच्या मनात हाच विचार सुरू होता की नागरिकांना प्रोत्साहित कसे करायचे. (जवाहरलाल नेहरू आणि कवी प्रदीप, फोटो: Twitter@SoarinMountains)
देशाला होती उभारीची गरज
कवी प्रदीप पुढे म्हणाले की, त्यावेळी सर्वांच्या नजरा फिल्म इंडस्ट्री आणि कवींकडे खिळल्या होत्या. देशाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काही तरी करावे, अशी अपेक्षा राजकारण्यांनीही चित्रपटसृष्टी आणि कवींकडून व्यक्त केली. त्यांचे असे म्हणणे होते की देशवासियांना पुन्हा एकदा उत्तेजित करेल असे काहीतरी तयार करा. कवी प्रदीप यांनी याआधीही अनेक देशभक्तीपर गीते लिहिली असल्याने त्यांना यावेळीही देशासाठी अशाप्रकारचे गाणे लिहिण्यास सांगण्यात आले, ज्यामुळे पुन्हा एकदा देशवासीयांमध्ये धैर्य वाढेल आणि त्यांच्यात देशभक्तीचा संचार होईल. (कवी प्रदीप यांच्यासोबत लता मंगेशकर, सौजन्य- ट्विटर)
असे लिहिले होते लता मंगेशकरांचं अजरामर गाणं ‘ए मेरे वतन’
त्यावेळी कवी प्रदीप यांच्या लेखणीतून ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे लिहिले गेले. हे गाणे लिहिण्यामागची कथाही रंजक आहे. असे बोलले जाते की, प्रदीप एकदा मुंबईत समुद्रकिनारी फिरत असताना देशाची स्थिती आठवून ते लाटांकडे पाहत होते. तेव्हाच त्यांनी काही ओळी सुचल्या. त्यानंतर कवी प्रदीप यांनी तिथून चालत जाणाऱ्या एका व्यक्तीकडे पेन मागितला आणि सिगारेटच्या बॉक्समध्ये आलेल्या फॉइलवर त्यांनी त्या ओळी लिहून काढल्या. कवी प्रदीप यांनी नंतर त्या ओळींमध्ये आणखी काही पंक्ती जोडून ‘ए मेरे वतन के लोगो’ हे संपूर्ण गाणे लिहिले. या गाण्याला संगीत देण्यासाठी कवी प्रदीप यांनी सी रामचंद्र यांच्याशी बोलून संगीत तयार करून घेतले.
लता मंगेशकरांना गायचे नव्हते ‘ए मेरे वतन’
त्या काळात लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि मुकेश हे तीन महान आवाज होते. कवी प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफी त्यावेळी नौशाद यांचे ‘अपनी आझादी को हम हरगीज मिट्टा सक्ते नही’ गाणार होते. तर राज कपूर यांनी मुकेश यांना ‘जिस देश में गंगा बहती है’ गाण्यासाठी साइन केले होते. अशा परिस्थितीत ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्यासाठी फक्त लता मंगेशकरच शिल्लक राहिल्या होत्या. जवाहरलाल नेहरूंसमोर जेव्हा लता मंगेशकरांनी हे गाणं पहिल्यांदा गायलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्यांना ‘ए मेरे वतन’साठी विचारण्यात आलेलं तेव्हा त्यांनी नकार दिलेला. मात्र कवी प्रदीप यांच्या वारंवार समजावून सांगितल्यानंतर त्यांनी गाणे गाण्यासाठी तयारी दर्शवली.
शिक्षक होते कवी प्रदीप, अशी मिळालेली गाण्याची संधी
कवी प्रदीप यांनी याच मुलाखतीत सांगितले होते की, ते एका शाळेत शिक्षक होते. पण त्यांना कविता लिहिण्याचाही छंद होता. एकदा ते काही कामानिमित्त मुंबईत आले असता तेथील एका कविसंमेलनात सहभागी झालेले. त्याठिकाणी कवी प्रदीप यांची भेट बॉम्बे टॉकीजमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीशी झाली. कवी प्रदीप यांची कविता त्यांना भावली होती. या व्यक्तीने हिमांशू राय यांना प्रदीप यांच्या कवितेबद्दल सांगितले. हिमांशू हे बॉम्बे टॉकीजचे मालक होते असून त्यांनी ताबडतोब प्रदीप यांना फोन केला. त्यांनी त्यांना एखादी कविता ऐकवण्यास सांगितले. हिमांशू त्यांच्या कवितांनी खूप प्रभावित झालेले आणि त्यांनी त्यांना गाणे लिहिण्याची ऑफर दिली. यानंतर सिनेविश्वात प्रदीप यांना विशेष लोकप्रियता मिळाली. (लाल बहादुर शास्त्री यांच्यासह कवी प्रदीप, फोटो: Twitter@IndianHistoryPic)
९० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीपासून दूर झाले कवी प्रदीप
पण ९० च्या दशकात कवी प्रदीप यांनी अचानक इंडस्ट्रीसाठी गाणी लिहिणे बंद केले होते. त्यांनी असे सांगितले की त्या दशकातील संगीतावर ते नाखूश होते. म्हणून त्याने स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले. कवी प्रदीप यांचे १९९८ साली निधन झाले. दरम्यान ‘ए मेरे वतन’ हे अजरामर गाणे गाणाऱ्या लता दीदींनीही ६ फेब्रुवारी २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला.