Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Session 2024: बंगला, कार, मोफत प्रवास, फ्री टोल! राज्यातील ३३ खासदारांचं आयुष्य आजपासून कसं बदलणार?
लोकसभेच्या एकूण सदस्यांची संख्या ५४३ इतकी आहे. पैकी ५२ टक्के सदस्य पहिल्यांदाच लोकसभेवर गेले आहेत. २८० जण पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले आहेत. यातील ४५ जण उत्तर प्रदेशचे आहेत. तर महाराष्ट्रातून ३३ जण पहिल्यांदाच लोकसभेचे सदस्य झाले आहेत. लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यावर खासदारांना अनेक सुविधांचा लाभ मिळू लागेल.
कोणकोणत्या सुविधा मिळणार?
खासदारांना वेतनासह अनेक भत्ते, प्रवासाच्या सुविधा, आरोग्य सुविधा, निवासस्थान, टेलिफोन, पेन्शन अशा सोयी मिळतात. खासदारांना १ लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय घरी होणाऱ्या बैठकीसाठी दिवसाकाठी २ हजार रुपयांचा भत्ता मिळतो. याशिवाय खासदारांना अधिवेशन, समितीच्या बैठकांना हजर राहण्यासाठी प्रवास सुविधा देण्यात येतात. अधिवेशनासाठी येण्या जाण्याचा खर्च दिला जातो. कोणताही खासदार अधिवेशनाला किमान १५ दिवस उपस्थित राहिल्यास त्याला प्रवास खर्च दिला जातो.
खासदारांना रेल्वेच्या फर्स्ट क्लास कोचमधून काही प्रवास मोफत करता येतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील प्रवास खर्चात सूट मिळते. अंदमान निकोबार, लक्ष्यद्विपच्या खासदारांना स्टिमरची सुविधाही दिली जाते. प्रवासासाठी अनेक सवलती आहेत. खासदारांना त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठीही पैसे दिले जातात. प्रत्येक खासदाराला २० हजार रुपये भत्ता, ४ हजार रुपये लेखन सामग्रीसाठी, २ हजार रुपये पत्रांसाठी दिले जातात. टोल सवलतीसाठी प्रत्येक खासदाराला दोन फास्टॅग देण्यात येतात. यातील एक दिल्ली आणि दुसरा त्यांच्या मतदारसंघात प्रवासासाठी असतो. त्यामुळे ते विनाटोल प्रवास करु शकतात.
खासदाराला १ लाख रुपये वेतन, मतदारसंघासाठी ७० हजार रुपये भत्ता, कार्यालयीन खर्चासाठी ६० हजार रुपये आणि दैनिक भत्ता मिळतो. याशिवाय प्रवास भत्ता, घर, वैद्यकीय सुविधाही मिळतात. खासदारांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार घरं दिली जातात. मंत्री असलेल्यांना वेगळ्या सुविधा मिळतात. निवृत्तीनंतर माजी खासदारांना दर महिन्याला २२ हजार रुपये पेन्शन आणि अन्य सुविधा मिळतात.